साजवार्ता
Page No.: 3 Date: 22/11/2026
विठ्ठल-रुक्मिणी मंदिरांमध्ये भाविकांची मांदियाळी
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता वार्ता) : कार्तिकी एकादशीनिमित्त शहरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरांमध्ये शनिवारी (दि.२१) भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. पहाटेपासूनच मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. भजन, पूजन, अभिषेक आणि विठ्ठलनामाच्या गजराने शहरातील मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाले.
गारखेड्यातील गजानन महाराज मंदिरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. भाविकांनी विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेत मनोभावे पूजाअर्चा केली. दुसरीकडे, 'प्रति पंढरपूर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बजाजनगर येथील विठ्ठल मंदिरातही भाविकांची
मोठी उपस्थिती होती. शहराच्या विविध भागांतून दिंड्या मंदिराकडे रवाना झाल्या. टाळ-मृदंगाचा गजर आणि विठ्ठल नामाच्या जयघोषामुळे संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. ज्योतीनगरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातही एकादशीनिमित्त दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी
सकाळी काकड आरती आणि भजन सोहळ्याने कार्यक्रमांची सुरुवात झाली. दर्शनासाठी दिवसभर भाविकांची ये-जा सुरू होती. भाविकांना प्रसादाचे वाटपही करण्यात आले. सायंकाळी सहाला मंदिरात हळदीचा समारंभ पार पडला. या धार्मिक विधींमध्ये भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
आज तुळशी विवाह सोहळा
ज्योतीनगर येथील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात रविवारी (दि.२२) तुळशी विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी पारंपरिक पद्धतीने तुळशी विवाह सोहळा पार पडणार आहे, अशी माहिती मंदिराचे विश्वस्त गिरिजाराम हाळनोर यांनी दिली.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions













